३० व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाळीव प्राण्यांचा वावर लक्षणीय  

जय मुझूमदार, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील १७ मोठय़ा व्याघ्र संरक्षण प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा श्वानांची संख्या अधिक असल्याचे व्याघ्र सर्वेक्षणासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांतील चित्रणांतून स्पष्ट झाले आहे. किमान ३० व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले.

श्वान आणि गुराढोरांच्या जंगलातील वाढत्या संचारामुळे वन्य प्राण्यांमध्ये अनेक रोगांचा फैलाव होण्याची भीती आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जंगलात पाळीव प्राण्यांचा वावर वाढल्यास अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी त्यांच्यात आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

व्याघ्र प्रकल्पांत पाळीव प्राण्यांची भटकंती वाढत असली तरी पर्यावरण मंत्रालयाने मात्र पाळीव प्राणी प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्पांच्या बाह्य़ भागांमध्ये वावरत असल्याचा दावा केला आहे. दर चार वर्षांनी करण्यात येणाऱ्या व्याघ्र सर्वेक्षणातून संरक्षित क्षेत्रांमध्ये किती अंतर आत श्वान आणि गुरांचा संचार आढळला, याची छायाचित्रणात्मक माहिती मिळत नाही, असेही पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘‘व्याघ्र संरक्षण क्षेत्रांमधील पाळीव प्राण्यांच्या संचाराच्या प्रश्नाचे गांभीर्य आम्हाला आहे. खेडय़ांलगतच्या काही भागांमध्ये श्वान आणि गुरे भटकताना आढळली. ‘कॅनिन डिस्टेंपर व्हायरस’सारख्या रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका ल क्षात घेऊन आम्ही पाळीव प्राण्यांचा संरक्षित क्षेत्रातील संचार कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अधिकारी एस. पी. यादव यांनी स्पष्ट केले.’’ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीनेच दर चार वर्षांनी वाघांचे सर्वेक्षण करण्यात येते.

संवेदनशील प्रकल्प

२०१८मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार १७ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा श्वानांची संख्या अधिक नोंदवली गेली. या १७ व्याघ्र प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील नागार्जून सागर-श्रीशैलम, राजस्थानातील सरिस्का, मध्य प्रदेशातील पेंच, पन्ना आणि बांधवगड, कर्नाटकातील भद्र, तमिळनाडूतील सत्यमंगलम आणि महाराष्ट्रातील मेळघाट या सात मोठय़ा व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. या सात व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची एकूण संख्या ४०० आहे.