देशभरात जमावाकडून होत असलेल्या हिंसक घटनांवर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही टिप्पणी केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा बचाव करताना जमावाने केलेल्या हत्यांचे सर्वाधिक गुन्हे हे वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत घडल्याचे सांगत या कार्यकाळात केंद्रात काँग्रेसचेच सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून गो तस्करी किंवा गोमांस खाण्याच्या संशयावर जमावाने हत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच झारखंड येथील रामगड परिसरात अलीमुद्दीन नावाच्या व्यक्तीची ही अशीच हत्त्या करण्यात आली होती. याबाबत शहा यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

तुलना करून मी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार नाही. मी याबाबत खूप गंभीर आहे. पण सत्य हे आहे की, वर्ष २०११, २०१२ आणि २०१३ मध्येही हिंसक जमावाच्या अनेक घटना घडल्या होत्या. आमच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जेवढ्या घटना घडल्या नाहीत. त्याहून अधिक काँग्रेसच्या एका वर्षाच्या कार्यकाळात झाल्या. पण तेव्हा हा प्रश्न कधी निर्माण झाला नाही, असा सवाल शहा यांनी या वेळी विचारला.

गोवा येथे पंचायत समिती व नगरपरिषदांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना त्यांनी आपले म्हणणे मांडले. समाजातील सर्व घटकांबरोबर भेदभाव केला जाणार नाही याबाबत पक्ष प्रतिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटलं. गोव्यातील काँग्रेस सरकारने १९७६ मध्ये गोहत्येवर बंदी घातली होती, हे त्यांनी आवर्जुन सांगितले. गोहत्या बंदीमागे भाजप नाही. गोव्यात पूर्वीपासूनच गोहत्या बंदी आहे. वर्ष १९७६ मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना गोहत्या बंदी करण्यात आली होती. तेव्हा कोणी काँग्रेसला प्रश्न विचारला नाही, असा उलट सवाल त्यांनी माध्यमांना केला.

काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर पहिल्यांदाच जरब बसली आहे. लवकरच काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात येईल, असेही शहा यांनी या वेळी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरही उपस्थित होते.