अतिश्रीमंतांकडील पैसा देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पाहून अधिक

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी निम्न स्तरावर ७० टक्के गरिबांकडे जेवढी संपत्ती आहे त्याच्या चार पट अधिक संपत्ती देशातील एक टक्का धनाढय़ांकडे आहे, तर भारतातील सर्व अब्जोपतींची संपत्ती ही संपूर्ण वर्षांच्या अर्थसंकल्पाहून अधिक असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

जागतिक आर्थिक मंचच्या (डब्ल्यूईएफ) ५० व्या वार्षिक परिषदेपूर्वी ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने ‘टाइम टू केअर’ हा अभ्यास अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये म्हटले आहे की, जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी खालच्या स्तरावर असलेल्या ६० टक्के जनतेकडे जेवढी संपत्ती आहे त्याहून अधिक संपत्ती जगातील २१५३ अब्जोपतींकडे आहे.

जागतिक पातळीवर असमानतेचे प्रमाण प्रचंड आहे, गेल्या दशकामध्ये अब्जोपतींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी असमानता दूर करणारी धोरणे आणल्याविना दूर करता येणे शक्य नाही, केवळ काही सरकारेच त्यासाठी बांधिलकी दर्शवीत आहेत, असे ऑक्सफॅमचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहार यांनी म्हटले आहे. ते ऑक्सफॅम महासंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आले आहेत.

जागतिक स्थिती

या अहवालानुसार, जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी खालच्या स्तरावर असलेल्या ६० टक्के जनतेकडे जेवढी संपत्ती आहे त्याहून अधिक संपत्ती जगातील २१५३ अब्जोपतींकडे आहे.