करोना व्हायरसचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता विस्कळीत झालेल्या जनजीवनाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावले टाकली जात असून, प्रवासी रेल्वे सेवा अधिक क्षमतेनं सुरू करण्याची योजना आखली आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं योजना तयार केली असून, राज्यांनीही याला संमती दिली आहे.

अचानक उद्भवलेल्या करोना संकटामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे काही महिने रेल्वे रुळावरच ठप्प झाली होती. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर केंद्र सरकारनं विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र, गर्दी टाळण्यासाठी नियमित एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या.

केंद्र सरकारकडून लॉकडाउन शिथिल केला जात असून, हळूहळू नागरिक घराबाहेर पडू लागले. जनजीवन पूर्वपदावर येत असून, काही महत्त्वाच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. वाढत्या रेल्वेगाड्यांच्या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयानं विशेष ट्रेनची संख्या वाढवण्यासाठी योजना तयार केली आहे. ज्या मार्गांवर अधिक मागणी होत आहे, अशा मार्गांवर विशेष ट्रेन धावणार असून, नियमित व पॅसेंजर ट्रेन यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे बंदच असणार आहेत.

आणखी वाचा- ई-पास रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरु

“ज्या भागातून जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी होत आहे, तेथील प्रवासाचा भार कमी करण्यासाठी सध्याच्या २३० मार्गांशिवाय जास्तीच्या विशेष ट्रेन चालवणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून यासाठी संमती घेण्यात आली आहे. तसेच पुढील चर्चा सुरू असून, या ट्रेनची संख्या किती असणार हे अद्याप सांगता येणार नाही. या विशेष ट्रेनची घोषणा एक दोन दिवसांत केली जाईल,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.