09 April 2020

News Flash

करोनाचा कहर : जगभरात २१ हजारांहून अधिक बळी

चार लाख ८१ हजार २३० जणांना लागण

संग्रहित छायाचित्र

करोनाने जगभरात थैमान घातले असून या विषाणूची लागण होऊन आतापर्यंत २१ हजार २९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० देशांमधील चार लाख ८१ हजार २३० जणांना लागण झाल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

स्पेनमध्ये २४ तासांत ६५५ मृत्यू

स्पेनमध्ये या विषाणूची लागण झाल्याने ४०८९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६५५ जण मृत्युमुखी पडले आहेत. स्पेनमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत १९ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत.

युरोपमधील मृतांची संख्या १४ हजार ६४०

युरोपमध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या गुरुवारी दोन लाख ५० हजारांवर गेली असून इटली आणि स्पेनमध्ये त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांचा समावेश आहे.

युरोपला करोनाचा सर्वाधिक तडाखा बसला असून दोन लाख ५८ हजार ६८ जणांना त्याची लागण झाली असून, त्यापैकी १४ हजार ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये ७४ हजार ३८६, तर स्पेनमध्ये ५६ हजार १८८ जणांना करोनाची लागण झाली आहे.

इराणमध्ये १५७ जण दगावले

इराणमध्ये गुरुवारी करोनाची लागण झाल्याने आणखी १५७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २२३४ वर पोहोचली आहे. गेल्या १४ तासांत आणखी २३८९ जणांना लागण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानौश जहानपौर यांनी सांगितले. करोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २९  हजार ४०६ झाली आहे. त्यांपैकी १० हजार ४५७ जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीत १९८ मृत्यू

जर्मनीमध्ये ३६ हजार ५०८ जणांना करोनाची लागण झाली असून १९८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे रॉबर्ट कोच संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फ्रान्समध्येही २५ हजार २३३ जणांना लागण झाली असून १३३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

वुहानमधील स्थिती नियंत्रणात! चीनमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक पातळीवर नव्याने करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, मात्र बाहेरून आलेल्या ६७ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. चीनमधील वुहान हा करोनाचा केंद्रबिंदू असून तेथील स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे, असे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चीनच्या हुबेई प्रांतात बुधवारी करोनाची लागण झालेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३२८७ वर पोहोचली आहे तर एकूण ८१ हजार २८५ जणांना लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:43 am

Web Title: more than 12000 victims worldwide abn 97
Next Stories
1 विषाणू रोखण्यासाठी सरकारला पाठिंबा!
2 करोनाच्या मुद्दय़ावरून ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने
3 VIDEO : मोदी सरकारने जाहीर केलेल्या भल्या मोठ्या पॅकेजमध्ये कुणाला काय मिळाले?
Just Now!
X