जगातील केवळ दहा देशांनीच उपलब्ध करोना लसींपैकी ७५ टक्के लसींचे नियंत्रण आहे. तर दुसरीकडे १३० हून अधिक देशांना अद्याप एकही लस मिळालेली नाही असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे मोजक्या देशांच्या हाती करोना लसीचे नियंत्रण असणे चुकीचे असून, अशा देशांनी इतर देशांना लसीचा पुरवठा केला पाहिजे, असं मतही गुट्रेस यांनी व्यक्त केलय. जागतिक स्तरावर सर्वच देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करता यावा म्हणून जी-२० देशांनी एक टास्क फोर्सची स्थापना करावी असं आवाहनही गुट्रेस यांनी केलं आहे. “सध्याच्या संकटाच्या काळामध्ये व्हॅक्सीन इक्वॅलिटी म्हणजेच लस पुरवठासंदर्भातील समानता हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठं आव्हान आहे,” असं गुट्रेस यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

अवर वर्ल्ड इन डेटाने दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये १८८ मिलियन म्हणजेच १८.८ कोटी जणांना लस दिली गेली आहे. यापैकी बहुतांश संख्या ही अमेरिका, चीन, युनायटेड किंग्डम आणि इस्रायलमधील आहे. जगातील तीन तृतीयांश लसींचा साठा असणारे १० देश कोणते आहेत याबद्दल बोलताना गुट्रेस यांनी कोणत्याही देशाचं नाव घेतलं नाही. मात्र त्यामध्ये अमेरिकाचा नक्कीच समावेश आहे. येथे ७२.४ कोटी लसींचे वितरण झालं आहे. पाच कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आल्याची माहिती अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने दिली आहे.

आणखी वाचा- “करोनाविरुद्धच्या लढाईत भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करतोय”; मोदी सरकारच्या मदतीची UN कडून दखल

गुट्रेस यांनी जी टास्क फोर्स स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे त्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समावेश असेल. यामुळे जगभरातील सर्वच देशांना लस पुरवण्यासाठी पैसे आणि वैज्ञानिक स्तरावरील मदत करणे सोप्प होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. खास करुन ग्लोबल साऊथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिका, लॅटीन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांना लसींचा पुरवठा करण्याची आवश्यकता आहे असं सांगण्यात येत आहे.

जागतिक स्तरावर सर्वच देशांनी करोना लसीसंदर्भात एकमेकांना मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोव्हॅक्स टास्क फोर्सची स्थापना केलीय. करोना लसींच्या शर्यतीमध्ये श्रीमंत देशांपुढे निभाव लागू न शकणाऱ्या गरीब देशांना लसपुरवठा करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. भारताने आतापर्यंत ५० हून अधिक देशांना करोनाच्या लसी भेट म्हणून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारताचे शेजारी देश आणि इतर गरीब तसेच लहान आकाराच्या देशांचा समावेश आहे.