उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथे एका घरात तब्बल १५० हून अधिक साप सापडल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. गावकऱयांनी सापांना पकडून वन विभागाकडे सोपविले असले तरी गावात भीतीचे वातावरण आहे. लखीमपूरमध्ये ओयल गावातील मेढक मंदिरच्या मागच्या बाजूला असलेल्या एका घरात हे साप आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र मिश्रा यांच्या घरात एका भींतीपाशी हालचाल होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना जाणीव झाली. शोध घेतला असता घराच्या एका कोपऱयात सापांची एक जोडी आढळून आली. या दोन सापांना जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर पकडण्यात आल्यानंतर त्याच ठिकाणी आणखी काही साप असल्याचे दिसून आले. कुटुंबियांमध्ये घबराट पसरली आणि काही क्षणात हे वृत्त संपूर्ण गावात वाऱयासारखे पसरले. त्यानंतर पोलीस आणि वनअधिकाऱयांच्या मदतीने घरातून तब्बल १५० हून अधिक साप पकडण्यात आले. इतके साप पाहून मिश्रा कुटुंबिय हैराण झाले आणि त्यादिवशीची रात्र संपूर्ण कुटुंबाला बाहेरच काढावी लागली.
वनअधिकाऱयांनीही या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे साप कसे आले, याचा शोध सुरू केला आहे.