देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी करोनाचा प्रसारावर अद्यापही नियंत्रण मिळालेलं नाही. देशातील करोना बाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील दहा दिवसांपासून देशात ४५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीनं दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील करोना बाधितांचा आकडा २० लाखांच्या काठावर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्याही ४० हजार झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ५२ हजार ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५५ इतकी झाली आहे. यापैकी ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्ण बरं होऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत ३९ हजार ७९५ रुग्ण मरण पावले आहेत.

देशात ५० हजारांपेक्षा रुग्ण आढळून आलेला बुधवार हा सलग सातवा दिवस आहे. महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देशातील राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे.

महाराष्ट्रातील स्थिती अशी?

मंगळवारी राज्यात १२ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ७ हजार ७६० रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ९९ हजार ३५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ४२ हजार १५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.