अफगाणिस्तानात गुरुवारी उत्तररात्री झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर डोंगर कोसळल्यामुळे तब्बल अडीच हजार लोक ढिगाऱ्यांखाली अडकून पडल्याची भीती असली तरी मृतांचा आकडा ५०० वर जाणार नाही, असे अफगाणिस्तानातील सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या नैसर्गिक आपत्तीत पहिल्यांदा मृतांचा आकडा फुगवून सांगितला गेला होता. मात्र ती स्थानिकांनी दिलेली माहिती होती. बचाव पथकातील सरकारी चमूकडून खातरजमा करण्याआधीच चुकीचा आकडा प्रसिद्ध करण्यात आला, असेही बादकशान प्रांताच्या गव्हर्नरनी सांगितले. मात्र सतत पडणारा पाऊस, डोंगराच्या मातीमुळे वाढणारा चिखल यामुळे बचावकार्य पूर्णपणे ठप्प झाले आहे.हवामान खाते आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी येत्या दोन दिवसांत डोंगर कोसळण्याच्या आणखी काही घटना घडू शकतात, असा इशारा दिला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात हाहाकार माजला आहे.
शुक्रवारपासून सरकारी पातळीवर तसेच व्यक्तिगत पातळीवरही मदतकार्य सुरू झाले, मात्र त्यात अनेक अडथळे येत आहेत. डोंगर कोसळल्यामुळे त्याखाली सुमारे ३०० घरे सापडली. सरकारी निरीक्षक आणि मदतकार्य चमूतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आपत्तीत आतापर्यंत ३०० जणांना आपले प्राण गमवावे लागले.

असा झाला नियतीचा आघात..
* सतत दोन दिवस अफगाणिस्तानातील आब बरीक प्रांतात अतिवृष्टी झाली. त्यामुळे येथे हाहाकार माजला होता.
* शुक्रवारी विशेष नमाज अदा करण्यासाठी अनेक ग्रामस्थ दोन वेगवेगळ्या मशिदींमध्ये जमले होते.
* त्यावेळी, पहिला डोंगर कोसळला आणि तो नेमका या दोन मशिदींवरच पडला.
*त्यामुळे नमाज अदा करणारे ग्रामस्थ त्याखाली सापडले.
* त्यांना वाचविण्यासाठी आसपासच्या गावांतून अनेक जण मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी मदत सुरू केली.
*मात्र त्याच वेळी दुसरा कडा कोसळला आणि मदत करणारे त्याखाली गाडले गेले.

मदतकार्य थांबणार?
अतिवृष्टीमुळे येथे प्रचंड चिखल झाला असून त्याच्या कित्येक मीटर खाली घरे गाडली गेली आहेत. तिथवर पोहोचणे अशक्य असल्याने शोध आणि बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेत असल्याचे बादकशान प्रांताचे गव्हर्नर शाह वलीउल्लाह अदीब यांनी सांगितले. दरम्यान  येथील बरीक गावातील ७०० कुटुंबे बेघर झाली असून त्या सर्वाना आसरा देण्यासाठी पुरेसे तंबूही नसल्याचे प्रशासनाने सांगितले. या आपत्तीत सुमारे २००० व्यक्ती विस्थापित झाल्या आहेत.