वॉशिंग्टन : अमेरिकेचे कायम नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंब- पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्याकरिता अमेरिकेतील २ लाख २७ हजारांहून अधिक भारतीय प्रतीक्षेत असून, मेक्सिकोनंतर प्रतीक्षा यादीतील ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या असल्याचे ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.

कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डासाठी अमेरिकी काँग्रेसने वर्षांला कमाल १ लाख २६ हजार इतकी संख्या निश्चित केली असली, तरी सध्या सुमारे ४० लाख लोक हे कार्ड मिळण्याची वाट पाहात आहेत.

प्रतीक्षा यादीत सर्वाधिक, म्हणजे १५ लाख लोक अमेरिकेचा दक्षिणेकडील शेजारी असलेल्या मेक्सिकोतील आहेत. याखालोखाल  इच्छुक भारतीयांची संख्या २ लाख २७ हजार, तर चीनची संख्या १ लाख ८० हजार इतकी आहे, असे अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटले आहे.

कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डाच्या प्रतीक्षा यादीपैकी बहुतांश हे अमेरिकी नागरिकांचे भाऊबंद आहेत. सध्याच्या कायद्यानुसार, अमेरिकी नागरिक हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि रक्ताच्या नातेवाईकांना ग्रीन कार्ड किंवा कायदेशीरदृष्टय़ा कायम नागरिकत्वासाठी पुरस्कृत करू शकतात.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अशा कुठल्याही तरतुदीच्या विरोधात असून ते याचे वर्णन ‘साखळी स्थलांतर’ (चेन मायग्रेशन) असे करतात आणि ते रद्द करण्यास इच्छुक आहेत. याउलट, कुटुंब- पुरस्कृत स्थलांतर पद्धत रद्द करण्यास विरोधी डेमॉक्रॅटिक पक्षाचा जोरदार विरोध आहे.

कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डासाठीच्या ४० लाख इच्छुकांशिवाय, आणखी ८ लाख २७ हजार लोक कायम कायदेशीर नागरिकत्व मिळवण्याची वाट पाहात असून त्यामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी असलेल्या रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळण्यासाठीची प्रतीक्षा १० वर्षांहून अधिक आहे.

जगभरात १७.५ दशलक्ष स्थलांतरित भारतीय

संयुक्त राष्ट्रे : भारत हा अद्यापही आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा सर्वात मोठा देश असून, जगभरात १७.५ दशलक्ष भारतीय वसले आहेत, तसेच परदेशी राहणाऱ्या भारतीयांकडून आपल्याला ७८.६ दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला असल्याचे संयुक्त राष्ट्र स्थलांतरित संघटनेने (यूएन मायग्रेशन एजन्सी) म्हटले आहे.

२०१९ साली आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या २७० दशलक्ष असल्याचा अंदाज असून, अंदाजे ५१ दशलक्ष इतक्या स्थलांतरितांसह अमेरिका अग्रस्थानी आहे, असे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) या संस्थेने ‘ग्लोबल मायग्रेशन रिपोर्ट २०२०’ या अहवालात म्हटले आहे.

हा एकूण आकडा जागतिक लोकसंख्येच्या एका लहानशा भागाचे प्रतिनिधित्व करतो. तथापि, दोन वर्षांपूवी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात दर्शवलेल्या स्तरापेक्षा यात फक्त ०.१ टक्के वाढ झाली आहे, असेही आयओएमने ताज्या अहवालात म्हटले आहे.

हा आकडा म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या मानाने फार कमी (३.५ टक्के) आहे. याचाच अर्थ, जगभरात बहुतांश लोक (९६.५ टक्के) ज्या देशात जन्माला आले, त्याच देशात राहतात, असा अंदाज असल्याचे ताज्या अहवालात नमूद केले आहे.