देशातील करोनाबाधितांची संख्या ५८ लाखांच्या पलीकडे गेली असून ४७ लाखांहून अधिक जण करोनातून बरे झाले आहेत.  करोनातून बरे होण्याचे देशातील प्रमाण ८१.७४ टक्क्य़ांवर गेले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

करोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाख १८ हजार ५७० वर पोहोचली असून एका दिवसात ८६ हजार ५२ जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९२ हजार २९० वर पोहोचली असून गेल्या २४ तासांत ११४१ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ४७ लाख ५६ हजार १६४ झाली आहे.

भारतात ७ ऑगस्ट रोजी करोनाबाधितांची संख्या २० लाखांहून अधिक होती, त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी ही संख्या ३० लाखांवर गेली, ५ सप्टेंबर रोजी ही संख्या ४० लाखांवर गेली आणि १६ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने ५० लाखांच्या पुढचा टप्पा गाठला.