बोको हराम संघटनेच्या संशयित अतिरेक्यांनी ६० हून अधिक महिला आणि मुलींचे अपहरण केल्याचा संशय स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या संघटनेच्या अतिरेक्यांनी बोर्नो राज्याच्या दाम्बोआ जिल्ह्य़ातील कुम्मेब्झा गावावर गेल्या आठवडय़ात केलेल्या हल्ल्यात ३० जण ठार झाले होते. या हिंसाचारातून बचावलेल्या लोकांनी यासंबंधी माहिती दिली. सदर गाव उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
या गावात वाहतुकीच्या फारशा सुविधा नसून तेथील वृद्ध महिला तसेच पुरुषांनी लास्सा येथे आश्रय घेतला. याच काळात महिलांचे अपहरण केले असण्याचा संशय आहे. बोर्नो राज्यातील मुलींचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. गेल्या १४ एप्रिल रोजीही बोको हराम संघटनेच्याच अतिरेक्यांनी चिबोक येथील शाळेत शिकणाऱ्या २०० हून अधिक विद्यार्थिनींचे अपहरण केले होते आणि या घटनेचे जागतिक स्तरावर पडसाद उमटले होते. दरम्यान, ७ जून रोजीही फुलानी गारकीन गावातील सुमारे २० तरुण महिलांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे.