गेल्या २४ तासांत देशात ८३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाखांवर पोहोचली आहे. याच वेळी, ४५ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.२५ टक्के इतके आहे.

करोनाग्रस्तांची देशभरातील संख्या ५६ लाख ४६ हजार १० इतकी झाली असून, २४ तासांत १०८५ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९० हजार २० झाली असल्याचे मंत्रालयाने बुधवारी सकाळी संकेतस्थलावर दिलेल्या माहितीत म्हटले आहे

देशात करोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४५८७६१३ इतकी झाली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.

देशात सध्या करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ९,६८,३७७ इतकी असून, हे प्रमाण एकूण करोनाबाधितांच्या १७.१५ टक्के इतके आहे.

राज्यात २४ तासांत ४७९ जणांचा मृत्यू

* राज्यात २१ हजार नवे रुग्ण आढळले असून, ४७९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

* गेल्या २४ तासांत १९,४७६ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या २ लाख, ७३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. बुधवारी मृतांचा आकडा मात्र तुलनेत जास्त होता. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ३३,८८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

* दिवसभरात रायगड ७४९, नाशिक १२४३, नगर ७४६, पुणे शहर १७९७, पिंपरी-चिंचवड ७८६, उर्वरित पुणे जिल्हा १२६४, सातारा ६०४, सांगली ६७४, नागपूर १८८४ नवे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत २३६० नवे रुग्ण

* मुंबईत बुधवारी २३६० नवीन रुग्ण आढळून आले, तर १८८४ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले. दिवसभरात ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या ८६०१ वर गेली आहे.

* मुंबईतील एकूण रुग्णसंख्या एक लाख ९० हजारांवर पोहोचली असून, आतापर्यंत ८१ टक्के म्हणजेच एक लाख ५४ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या २७,०६३ इतकी झाली आहे.

* मुंबईतील रुग्णवाढीचा दर गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत काहीसा कमी झाला असून तो १.१५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी ६१ दिवसांवर आला आहे.

* वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली या भागांत रुग्णवाढीचा वेग सर्वात जास्त आहे. या भागांतील रुग्णदुपटीचा कालावधीही दीड महिन्यावर आला आहे. बोरिवली आणि अंधेरीमध्ये दरदिवशी सव्वाशे ते दीडशे रुग्णांची नोंद होत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १,९३६ करोनाबाधित

जिल्ह्य़ात बुधवारी १ हजार ९३६ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ६३ हजार ५९५ वर पोहोचली आहे. दिवसभरात २९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ४ हजार २३४ इतकी झाली आहे. जिल्ह्य़ात बुधवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ४६५, कल्याण-डोंबिवलीतील ४६३, नवी मुंबईतील ४१९, मीरा-भाईंदरमधील २०७, ठाणे ग्रामीणमधील १३०, उल्हासनगर शहरातील ७२, अंबरनाथ शहरातील ६९, बदलापुरातील ५८ आणि भिवंडी शहरातील ५३ रुग्णांचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये नवी मुंबईतील ७, कल्याण-डोंबिवलीतील ५,  मीरा-भाईंदरमधील ५, उल्हासनगरमधील ४, ठाणे शहरातील ३, अंबरनाथमधील २, ठाणे ग्रामीणमधील २ आणि बदलापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.