बांगलादेशातील दहशतवादी व कडव्या अतिरेक्यांविरुद्ध सुरू केलेल्या देशव्यापी अटकसत्रात पोलिसांनी ११९ संशयित दहशतवाद्यांसह ८५०० हून अधिक लोकांना अटक केली आहे.

या मुस्लीमबहुल देशात अल्पसंख्याक व धर्मनिरपेक्ष लेखकांवरील प्राणघातक हल्ल्यांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी पोलिसांनी हे अटकसत्र सुरू केले आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत ८५६९ जणांना अटक केली असून त्यातील ११९ संशयित दहशतवादी आहेत. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपर्यंत ३४ संशयित दहशतवाद्यांसह ३२४५ लोकांना अटक करण्यात आली, अशी माहिती ढाका पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते कमरूल अहसान यांनी पत्रकारांना दिली.

अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी बहुतांश जाग्रोत मुस्लीम जनता बांगलादेश (जेएमजेबी)किंवा अन्सारउल्ला बांगला टीम (एबीटी) या बंदी घातलेल्या संघटनांचे आहेत. पोलीस महानिरीक्षक शाहिदुल हक यांनी गेल्या आठवडय़ात घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर दहशतवाद्यांविरुद्ध आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून या लोकांना अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकरवी प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. इस्लामिक स्टेट आणि भारतीय द्वीपकल्पातील अल-कायदा यांनी यापैकी काही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असली, तरी बांगलादेशात या गटांचे अस्तित्व असल्याचे सरकारने आजवर नाकारले आहे.