सेऊल : दक्षिण कोरियात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता सहा हजारांहून अधिक झाली असून अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आणि मास्कचा पुरवठा अधिक प्रमाणात होण्यासाठी अन्य पावले उचलली आहेत.

जपानने आपल्या शेजारी देशातून येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे स्वतंत्र कक्षात ठेवण्याचे ठरविले असल्याचे वृत्त ‘योमियुरी’ दैनिकाने दिले आहे. तर दक्षिण कोरियात अलीकडेच जाऊन आलेल्या परदेशी प्रवाशांना ऑस्ट्रेलियाने प्रवेशबंदी केली आहे.

दक्षिण कोरियात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ६०८८ झाली असून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या निर्यातीवर शुक्रवारपासून बंदी घालण्यात येणार असल्याचे पंतप्रधान चुंग स्ये-क्यून यांनी सांगितले.

दक्षिण कोरियात मास्क लावणे सर्वसाधारण झाले असून त्यांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे, मास्क खरेदीसाठी लांबलचक रांगा लागल्याचे दिसत आहे आणि मास्कचा पुरवठा करण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत.

दक्षिण कोरियात दररोज एक कोटी मास्क तयार करण्यात येत असून उत्पादकांनी ८० टक्के मास्क टपाल कार्यालये, फार्मसी आणि देशव्यापी कृषी सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश सरकारने दिला आहे.

इराणमध्ये १०७ जणांचा मृत्यू

दुबई : इराणमध्ये ३५१३ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कागदी चलनाचा वापर कमी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून प्रवासावर मर्यादा घालण्यासाठी मोठय़ा शहरांमध्ये तपासणी नाके सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. इराणचे आरोग्यमंत्री सईद नामकी यांनी नव्या र्निबधांची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. नवरोझ या नववर्षदिनापर्यंत शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाची लागण रोखण्यासाठी वाहनांमध्ये गॅसचा भरणा करताना लोकांनी वाहनातच बसावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. चीननंतर इटली आणि इराणमध्ये करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे.

अमेरिकेत ११ बळी

सिएटल : सिएटल परिसर हे करोना विषाणूचे नवे केंद्र बनले असल्याने त्या परिसराची तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, करोनाची लागण झाल्याने अमेरिकेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सॅक्रामेण्टोजवळ कॅलिफॉर्नियाच्या प्लेसर परगण्यात जहाजाने सॅन फ्रान्सिस्कोहून मेक्सिकोला आलेल्या एका वृद्धाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅलिफॉर्नियाच्या गव्हर्नरने बुधवारी रात्री करोनामुळे राज्यव्यापी आणीबाणी जाहीर केली. वॉशिंग्टन आणि फ्लोरिडामध्ये यापूर्वीच आणीबाणी जाहीर करण्यात आली असून हवाईमध्येही बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली. करोनामुळे मरण पावलेल्यांपैकी बहुसंख्य जण कर्कलॅण्डमधील लाइफ केअर केंद्रातील आहेत. सिएटल परिसरामध्ये ३९ जणांना करोनाची लागण झाली आहे.