#AareyForest: ‘आरेमधील झाडे कापली तर मुंबईला पुराचा धोका’; राज्य सरकारच्या त्या अहवालाची पुन्हा चर्चा
उच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत आरेमधील ४०० हून अधिक झाडे कापली

उच्च न्यायलयाने आरेमधील वृक्षतोड करण्यास संमती दिल्यानंतर शुक्रवारी रात्रीच आरेमधील ४०० हून अधिक झाडे तोडण्यात आली. रात्री प्रशासनाने केलेल्या या कारवाईला पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. आरेमधील झाडे तोडत असल्याची माहितीसमोर आल्यानंतर रात्रीच अनेक पर्यावरण प्रेमी आरेतील कारशेड परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यांनी वृक्षतोड थांबवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. रात्री तीन वाजेच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. वाचा सविस्तर…

#AareyForest: ‘मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवा’; आदित्य ठाकरे संतापले

‘ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं’ अशी जळजळीत टीका युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेड येथील वृक्षतोडीवरुन केली आहे. आरे काॅलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या मुद्द्यावरुन ट्विटवर #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे. आदित्य ठाकरे यांनाही ट्विट करुन या कारवाईचा विरोध केला आहे. वाचा सविस्तर…

खडसे, बावनकुळे, तावडेच नव्हे, भाजपाने २० विद्यमान आमदाराचा केला पत्ता कट

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकिट कापल्यामुळे नाराज समर्थकांनी उमेदवार पराग शहा यांची घाटकोपरमध्ये गाडी फोडली. बोरीवलीमधून उमेदवारी न दिल्यामुळे चिडलेल्या तावडे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. तावडे, खडसे आणि प्रकाश मेहता यांच्यासह भाजपाने तब्बल १८ आमदारांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडाचे निशाल फडकले आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या ७ तारखेपर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. वाचा सविस्तर…

बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट

मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या, अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे. वाचा सविस्तर…

बॉलिवूड कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध

आरे काँलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री दिया मिर्झा, विशाल दादलानी, स्वरा भास्कर, अशोक पंडित अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर…