बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. यादरम्यान बिहारमध्ये प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. प्रचारसभेतील त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ १२ ऑक्टोबरचा आहे. या व्हिडीओत नित्यानंद राय जेडीयूचे उमेदवार उमेश कुशवाहा यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, “बिहारमध्ये आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील”.

नित्यानंद राय यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना मुद्दा मिळाला आहे. काँग्रेस नेता संतोष कुमार यांनी नित्यानंद राय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांना प्रचारसभेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आरजेडी प्रवक्ता अन्वर हुसैन यांनी भाजपा नेते भीतीपोटी अशी वक्तव्यं करत असल्याची टीका केली आहे. भाजपाने मात्र नित्यानंद राय यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

आणखी वाचा- बिहार विधानसभा निवडणूक; नऊ भाजपा नेत्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी

भाजपा प्रवक्ता प्रेम रंजन पटेल यांनी बिहार नेहमीच दहशतवाद्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर राहिलं आहे यामध्ये काही दुमत नसल्याचं म्हटलं आहे. “पंतप्रधानांच्या पाटणा येथील प्रचारसभेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेजस्वी आणि आरजेडीचं सरकार आलं तर दहशतवादी आश्रय घेतील यामध्य दुमत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- बिहारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; संजय राऊत यांनी केला खुलासा

बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान होणार असून १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.