काश्मीरमधील पांपोर येथे भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून घुसखोर दहशतवाद्यांशी लढत असताना सभोवतालच्या परिसरातील मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरून दहशतवाद्यांचा जयजयकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे भारतीय जवान दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या काश्मिरींची सुटका करण्याचे प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे ध्वनिक्षेपकांवरून दहशतवाद्यांचे स्तुती करीत त्यांना प्रोत्साहन देण्यात येत होते.
सलग ४८ तास सुरू असलेल्या पांपोर येथील दहशतवादी चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. लष्कराने कमांडो दलाचे तीन जवान यात गमावले, त्यात दोन कॅप्टनचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी येथील ईडीआय इमारतीतून विद्यार्थ्यांसह १०० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, त्याचवेळी त्या परिसरातील मशिदीमध्ये त्या दहशतवाद्यांना ‘मुजाहिद‘ म्हणजेच पवित्र योद्धे असे संबोधून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती. ‘जागो, जागो सुबह हुई, जिवे जिवे पाकिस्तान’, तसेच ‘हम क्या चाहते है- आझादी’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी चकमकीच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेकडो काश्मिरी तरूणांनी गर्दी केली होती. या तरूणांनी दगडफेक करत लष्करी कारवाईत अडथळा आणण्याचाही प्रयत्न केला.

घाई नको -लष्कराच्या सूचना
दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी घाई करू नये तरच लष्कराची आणखी जीवितहानी टळेल, असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना अमुक एका मुदतीत बाहेर काढा असे म्हटलेले नाही, जवानांनी घाई करू नये, आपली प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूटच्या दोन इमारती मोकळ्या करण्यात आल्या आहेत. आता तिसऱ्या इमारतीत दहशतवादी लपले आहेत, पण घाई करण्याचे कारण नाही. हा सगळा परिसर १५ एकरचा आहे तेथे १० हजार चौरसफुटांचे बांधकाम असून मोठय़ा ४०-५० खोल्या आहेत, लष्कराने तीन मोहरे गमावले आहेत. खोल्या तपासताना सावधानता बाळगली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.