देशातील अनेक बडय़ा उद्योगपतींना व्यवसायात मदत करण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या (लॉबिंग) नीरा राडिया यांना परदेशात कंपनी स्थापन करण्यासाठी पनामातील मोझॅक फोन्सेका या कायदा सल्लागार कंपनीने मदत केल्याची माहिती पनामा कागदपत्रांतून उघड झाली आहे.
राडिया यांची वैष्णवी कम्युनिकेशन्स ही कंपनी अनेक उद्योगसमूहांसाठी जनसंपर्क सेवा पुरवत असे. त्यासाठी त्यांनी अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी व उद्योगपतींबरोबर केलेल्या दूरध्वनी संभाषणाच्या ध्वनीफिती उघड झाल्याने काही वर्षांपूर्वी देशात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात त्यांची परदेशात काही मालमत्ता असल्याचे धागेदोरे प्राप्तिकर खात्याच्या हाती लागले होते. आता उघड झालेल्या पनामा कागदपत्रांमधून त्याला दुजोरा मिळत आहे.
राडिया यांनी १९९४ साली ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये क्राऊनमार्ट इंटरनॅशनल ग्रुप लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली. त्या कामी त्यांना पनामातील मोझ्ॉक फोन्सेका या कंपनीची मंदत झाली होती असे पनामा कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. २००९ साली या कंपनीची माहिती मोझ्ॉक फोन्सेकाच्या नोंदवहीतून वगळण्यात आली. यासंबंधी राडिया यांच्या कार्यालयातर्फे कळवण्यात आले की, नियमांनुसार वेळोवेळी भारत आणि ब्रिटनमधील आवश्यक त्या करसंबंधी खात्यांना माहिती पुरवण्यात आली होती.