इंग्लंडमध्ये घडणाऱ्या बाललैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे असे इंग्लंडचे गृहसचिव साजिद जाविद म्हणाले. बीबीसीच्या रेडिओ ४ शी बोलताना त्यांनी हे विधान केले. साजिद जाविद स्वत: पाकिस्तानी वंशाचे आहेत. आरोपीच्या जातीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कट्टरतवाद्यांना बळ मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले.

लहान मुलांसोबत घडणाऱ्या अशा घटनांबद्दल यावर्षी साजिद जाविद यांनी एका टि्वट केले होते. त्यावरुन तीव्र पडसाद उमटले होते. ब्रिटीश पाकिस्तानी कादंबरीकार कमिला शमसी यांनी त्यांची मुलाखत घेतली. कमिला शमसी यांनी तुमच्या विधानामुळे द्वेष, तिरस्काराच्या घटना वाढू शकतात त्याची तुम्हाला चिंता वाटते का ? असा प्रश्न विचारला.

त्यावर जाविद यांनी राजकारण्यांनी भाषा जपून वापरण्याची गरज आहे. त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे असे उत्तर दिले. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये गुन्हेगार ज्या समाजातून येतात ती पार्श्वभूमी सुद्धा त्यांच्या अशा वर्तनाला कारणीभूत असू शकते असे जाविद म्हणाले. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींचे गुण आणि परिस्थिती यावर सखोल संशोधन झाले पाहिजे असे जाविद म्हणाले. गुन्हेगाराच्या जातीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा गुन्ह्यांना अधिक बळ मिळते असे जाविद यांचे मत आहे.

अमिरी सिंग धालीवाल, इरफान अहमद, झाहीद हसन, मोहम्मद रिझवान अस्लम आणि अब्दुल रेहमानसह पाकिस्तानी वंशाचे १५ जण लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये इंग्लंडमध्ये दोषी ठरले आहेत.