News Flash

निश्चलनीकरणानंतर अनेकांची दोन लाखापेक्षा अधिक रकमेची नोटावापसी!

एकाच पॅनकार्ड नंबरशी २० बँक खाती संलग्न असल्याचे दिसून आले आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जुन्या नोटांची वापसी करताना अनेकांनी दोन लाखांची मर्यादा ओलांडली

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जुन्या नोटा जमा करताना बहुतांश लोकांनी बँकांमध्ये दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम जमा केल्याचे समोर आले आहे. महसूल सचिव हसमुख अधिया यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर जुन्या नोटा जमा करण्यासाठी झालेल्या व्यवहारांमध्ये बँकांमध्ये दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक ठेवी जमा करण्याचे प्रमाण दोन तृतीयांश इतके आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी बँकांमध्ये एकच झुंबड उडाली होती. याबद्दल हसमुख अधिया यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जी दोन लाखांपेक्षा कमी रक्कम जमा करण्यात आली आहे, त्यामध्ये जुन्या नोटांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी बहुतांश लोकांकडून दोन किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यात आली आहे. बँकेत अडीच लाखांपर्यंत पैसे जमा करणे सुरक्षित आहे, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे अनेकजणांनी त्यांच्या १० ते १५  बँक खात्यांमध्ये पैसे जमा करताना २.२५ लाखांपर्यंतची रक्कम भरली आहे. आम्हाला काही ठिकाणी तर एकाच पॅनकार्ड नंबरशी  २० बँक खाती संलग्न असल्याचे दिसून आल्याचेही अधिया यांनी सांगितले. दरम्यान, नोटाबंदीनंतर दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक ठेवींच्या स्वरूपात एकूण १०.३८ लाख कोटींची रक्कम जमा झाली आहे. या सगळ्यामध्ये मोठी विसंगती दिसून येत असून या सगळ्याची चौकशी केला जाणार असल्याचे अधिया यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच नोटाबंदीनंतर ज्या खातेधारकांनी संशयित व्यवहार केले आहेत त्या खातेधारकांची आयकर विभागातर्फे ऑनलाइन चौकशी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आठ नोव्हेंबरनंतर ज्या खातेधारकांनी आपल्या खात्यांमध्ये आपल्या जाहीर उत्पन्नापेक्षा जास्त पैसा टाकला असेल त्यांची ऑनलाइन चौकशी केली जाणार आहे. अशा खातेधारकांना नोटीस दिली जाईल आणि त्यांना आपल्या खात्यांबाबतचे स्पष्टीकरण ऑनलाइन भरावे लागणार आहे. जर आयकर विभागाला दिलेले उत्तर समाधानकारक नसेल तर अशा खातेधारकांची प्रत्यक्ष चौकशी देखील होणार आहे. प्रत्यक्ष चौकशीमध्ये होणारा त्रास आणि श्रम पाहता ऑनलाइन चौकशी करणे अधिक सुलभ राहिल असा विचार आयकर विभागाने केला आहे. या चौकशीचा मुख्य उद्देश संशयित खातेधारकांच्या उत्पन्नाचा स्रोत शोधणे हा आहे. रोकड जमा करण्याबाबतची माहिती आयकर विभागाच्या इ फायलिंग विंडोवर उपलब्ध आहे. आयकर विभागाने एक युजर गाइडसुद्धा दिले आहे. कॅश ट्रांझॅक्शन २०१६ च्या कंप्लायंस या लिंकचा वापर करुन तुम्ही ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतचे बॅंकेचे व्यवहार पाहू शकता. तुमच्या पॅन नंबरशी जोडलेल्या खात्यांचे व्यवहार यावर उपलब्ध आहेत. पॅन नंबर नसलेल्या खात्यांचाही पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या खात्यामध्ये जाहीर उत्पन्नापेक्षा रोकड कशी आली त्याचे स्पष्टीकरण वेबसाइटवर द्यायचे आहे. जर एका खात्यामधून काढून दुसऱ्या खात्यामध्ये जर रोकड भरली असेल तर त्याचा पुरावा देणे अनिवार्य आहे. जर दुसऱ्या व्यक्तीकडून रक्कम घेतली असेल तर त्याचे नाव देणे अनिवार्य आहे. ही रक्कम तुम्ही कशाच्या स्वरुपात स्वीकारली जसे की कर्ज, भेट किंवा देणगी याचा तपशील देणे आवश्यक आहे. नोटाबंदीनंतर संशयित खाते म्हणून १८ लाख लोकांना आतापर्यंत नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 8:45 am

Web Title: most deposited rs 2 lakh or more some used one pan for 20 accounts govt
Next Stories
1 महिला आरक्षणाविरोधात नागालँडमध्ये हिंसाचार
2 टर्नबुल यांच्याशी संभाषण सुरू असताना दूरध्वनी खंडित
3 लिची फळामुळे मुझफ्फरपूरमध्ये मेंदूचा घातक रोग
Just Now!
X