आत्महत्या…मग ती कोणीही केलेली असो अंगावर काटा आणणारी घटना असते. तसं पाहायला गेलं तर देशातील आत्महत्येचं प्रमाण काही कमी नाहीये. पण त्यातच आत्महत्या जर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी केली असेल तर त्याची कायमच चर्चा असते. आज आम्ही तुम्हाला गेल्या काही काळात देशाला हादरवणाऱ्या आत्महत्यांबाबत सांगणार आहोत.

हिमांशू रॉय –
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी गेल्या महिन्यात 11 तारखेला आत्महत्या केली. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवलं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. ते अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली.


मन्मथ म्हैसकर-
ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ म्हैसकर याने 18 जुलै 2017 रोजी आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला. साडे सातच्या सुमारास नेपियन्सी रोडवरील दरिया महल या इमारतीमधून एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मन्मथ हा म्हैसकर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे.

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे.

प्रत्युषा बॅनर्जी –
‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (२४) हिने 2 एप्रिल 2016 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मूळची जमशेदपूरची असलेली प्रत्युषा २०१० सालापासून मुंबईत राहात होती. तिच्या ‘बालिका वधू’ या मालिकेला अफाट लोकप्रियता मिळाली. तब्बल तीन वर्षे ही मालिका सुरू होती. तेव्हापासून प्रत्युषा कायम प्रसिद्धीच्या झोतात होती. ‘बिग बॉस’ मध्येही तिने सहभाग घेतला होता. गुलमोहर ग्रँड, कॉमेडी क्लासेस, कुमकुम भाग्य, मन मे है विश्वास या मालिका व कार्यक्रमांतही प्रत्युषाचा सहभाग होता. अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या प्रत्युषाचे खासगी आयुष्य मात्र तणावाचे होते. २०१३ मध्ये तिने प्रियकर मकरंद मल्होत्राविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तसेच पोलिसांनी आपल्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची तक्रारही प्रत्युषाने कांदिवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तिचे राहुलराज सिंग या दिग्दर्शकाशी प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमसंबंधांत निर्माण झालेल्या तणावामुळे प्रत्युषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला होता.

Jiah Khan and Sooraj Pancholi
जिया खान, सूरज पांचोली

जिया खान –
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने वर्ष 2013 मध्ये मुंबईतील जुहू येथील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या मार्च २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘नि:शब्द’ चित्रपटातून जियाने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. जियाच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती.‘नि:शब्द’ चित्रपटातून जियाला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ‘हाऊसफुल्ल’ हा जियाचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटातही जियाने छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र, जियाच्या आईने तिच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित करत तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर संशय व्यक्त केला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबतचा खटला अद्याप सुरू आहे.

Bhaiyyuji Maharaj
Bhaiyyuji Maharaj: आयुष्यातील ताणतणाव सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे भय्यूजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

भय्यू महाराज –
राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेले भय्यू महाराज यांनी आज दुपारी सिल्वर स्प्रिंग येथील आपल्या निवासस्थानात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भय्यू महाराज यांनी आपल्या उजव्या कानशिलाजवळ गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. भय्यू महाराज यांचे राजकीय वर्तुळात मोठे वजन होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राजकारणात अनेकदा त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या शब्दाला सरकारदरबारी मान होता. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने अलीकडेच काही आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. त्यात भय्यू महाराज यांचाही समावेश होता. मात्र, शिवराज सरकारकडून मिळालेला हा सन्मान भय्यू महाराज यांनी नम्रपणे नाकारला होता.