काठमांडू : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना संधी मिळणार आहे. ७८ भारतीय गिर्यारोहकांना नेपाळच्या पर्यटन खात्याने हे शिखर सर करण्याची परवानगी दिली आहे.

नेपाळने १४ मेपासून एव्हरेस्टवर जाण्यासाठीचा मार्ग खुला केला आहे. हे शिखर सर करण्यासाठी या वर्षी देश-विदेशातील ३८१ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली असून, सर्वाधिक म्हणजे ७८ भारतीय गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे नेपाळच्या पर्यटन खात्याच्या संचालक मीरा आचार्य यांनी सांगितले. भारताच्या खालोखाल अमेरिकेच्या ७५ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांत युरोपियन गिर्यारोहकांनी मोठय़ा प्रमाणात हे शिखर सर करण्याचे प्रयत्न केले होते, तर भारतीय गिर्यारोहकांची संख्या कमी होती, असेही आचार्य यांनी सांगितले.

या हंगामात जवळपास ६०० हून अधिक जणांनी एव्हरेस्ट सर केले आहे. यात विदेशी गिर्यारोहक, नेपाळी गिर्यारोहकांसह, शेर्पा आदींचा समावेश आहे.  १४ मेपासून मार्ग खुला केल्यानंतर आठ शेर्पाचा गट यशस्वीरीत्या हे शिखर सर करू शकला आहे. शनिवारी २४ मे रोजी सर्वाधिक म्हणजे २०० जण एव्हरेस्ट सर करण्यास प्रारंभ करतील. तर २७ मे रोजी १०० गिर्यारोहक शिखर सर करण्याचा प्रयत्न करतील. आतापर्यंत या मोहिमेत ८ भारतीय गिर्यारोहकांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी हे शिखर प्रथम सर केले. त्यानंतर आतापर्यंत ६ हजार गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले आहे.