भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. एरवीदेखील काटजू त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मार्कंडेय काटजू यांच्या अधिकृत फेसबुसवरील पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना ‘बदमाश’ म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नरसंहार’ करणारा असा केला आहे. या सर्व राजकारण्यांना खरचं जगण्याचा अधिकार आहे का ? नाही, त्यांनी त्यांच्या कृत्यामुळे जगण्याचा अधिकार गमावला आहे, अशा शब्दांत काटजू यांनी राजकारण्यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरियातील दौऱ्यादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानाचादेखील काटजू यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. भारतात जन्म घेणे एकेकाळी लज्जास्पद होते असे एका महान व्यक्तीने कोरियात म्हटले आहे. मात्र, मी त्याच्याशी सहमत नाही. भारतात जन्म घेऊन मी चूक केली आहे, असे मला आयुष्यातील एक क्षणदेखील वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अनेक वाईट गोष्टी असतील, तरी मला भारतीय असल्याबद्दल अभिमान आहे. या वाईट गोष्टी वगळल्या तर विज्ञान, कला, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय व्यक्तींनी केलेली कामगिरी अचंबित करणारी असल्याचे काटजू यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनाही लक्ष्य केले असून प्रसारमाध्यमे अत्यंत खालच्या पातळीवर उतरून मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याचा आरोप काटजू यांनी केला. मला भारतातील बेरोजगारी, गरिबी, महागाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, चांगल्या शिक्षण सुविधेचा अभाव, ५० टक्के मुलांचे कुपोषण , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भेदभाव अशा अनेक गोष्टींचा तिटकारा वाटतो. मात्र, प्रसारमाध्यमे अशा मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करतात आणि त्यांना क्रिकेट, भविष्य, चित्रपटांतील स्टार्स अशा टुकार गोष्टींकडे वळवत असल्याचे काटजू यांनी सांगितले.