जगावर सकारात्मक प्रभाव टाकणारा देश कोणता असा प्रश्न विचारताच तुमच्या डोक्यात अमेरिका किंवा चीन या देशांचे नाव येईल. पण प्रत्यक्षात जगातील सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेची घसरण झाली आहे. सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या देशांच्या क्रमवारीत कॅनडा अव्वल स्थानी असून अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारत सातव्या स्थानावर आहे.

एका आंतरराष्ट्रीय संस्थेने जगावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. सर्वेक्षणात २५ देशांमधील एकूण १८ हजार जणांची मते जणून घेतल्यानंतर १२ देशांची यादी तयार करण्यात आली आहे. जगावर अमेरिका सकारात्मक प्रभाव टाकत असल्याचे फक्त ४० टक्के लोकांना वाटले. याऊलट अमेरिकेचा शेजारी राष्ट्र कॅनडा या यादीत पहिल्या स्थानी आहे. कॅनडा सकारात्मक प्रभाव टाकत असल्याचे ८१ टक्के लोकांना वाटते.
कॅनडानंतर ऑस्ट्रेलिया (७९ टक्के), जर्मनी (६७ टक्के) हे देश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. १२ देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी आहे. भारत प्रभावशाली देश असल्याचे ५३ टक्के लोकांना वाटते. पण भारताविषयी ही समाधानकारक बाब नाही. गेल्या वर्षी ५५ टक्के लोकांनी भारत जगभरात सकारात्मक प्रभाव टाकत असल्याचे म्हटले होते.

यादीत चीन आठव्या स्थानी असून चीनविषयी फक्त ४९ टक्के लोकांनाच असे वाटते. रशियाचीदेखील हीच अवस्था असून रशिया सकारात्मक प्रभाव टाकत असल्याचे फक्त ३५ टक्के लोकांना वाटते. सर्वेक्षणातून आणखी एक माहितीदेखील समोर आली आहे. २५ देशांमध्ये सुमारे ८६ टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात जग धोकादायक झाल्याचे मान्य केले.