इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आरिज खान उर्फ जुनैदला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. पाच बॉम्बस्फोटांमध्ये आरिजचा हात होता. २००८ मधील बाटला हाऊसमधील चकमकीनंतर तो पसार होता.

सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीतील बाटला हाऊस येथील चकमकीत आरिज खान हा पळून जाण्यात जाण्यात यशस्वी ठरला होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा या चकमकीत शहीद झाले होते.

आरिज उर्फ जुनैद हा २००८ पासून भारतातील गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. त्याचा पाच बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. अखेर दिल्ली पोलिसांनी भारत – नेपाळ सीमेवरुन त्याला अटक केली आहे.

आरिज हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतले होते. त्याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १० लाख रुपयांचे तर दिल्ली पोलिसांनी ५ लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.