आई आणि बाळ यांच्या नात्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. प्रत्येक आईसाठी आपलं बाळ खासच असतं. आपल्या बाळावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी आई परोपरीने काळजी घेत असते. पाच वर्षांपर्यत लहान मुल आईच्या दूधावरच अवलंबून असतं. बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृतासमान असतं. मात्र अजाणतेपणी एक आई आपल्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. मुज्जफरनगर येथे अशीच एक घटना घडली असून आईला साप चावल्यानंतर तिचे दूध प्यायल्यामुळे एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.

मुज्जफरनगरमधील मंडाला येथे एका महिलेला साप चावला होता. मात्र साप चावल्याची जाणीव या महिलेला झालीच नाही.त्यातच बाळाला भूक लागल्यामुळे या महिलेने आपल्या अडीच वर्षाचा मुलीला दूध पाजले. या दूधामध्ये सापाचे विष भिनल्यामुळे बाळाला विषबाधा झाली आणि त्यातच चिमुरडीचा मृत्यू झाला.

साप चावल्यामुळे सापाचे विष चिमुरडीच्या आईच्या अंगात भिनले होते. हेच विषारी दूध आईने अजाणतेपणी आपल्या चिमुरडीला पाजले. दुध प्यायल्यानंतर चिमुरडी अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आईने पाहिले असता चिमुरडीच्या हालचाली मंद झाल्या होत्या. या घटनेची माहिती घरातील अन्य व्यक्तींना समजल्यावर त्यांनी दोघी मायलेकींना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. चिमुकलीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच बाळाच्या आईचाही मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकारमुळे गावावर शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे.