संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) एका युरोपियन महिलेला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. आपण स्वत: घटस्फोटीत पीडित असल्याचे सांगून तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन निधी गोळा करत अनेकांची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. ‘मी घटस्फोटीत आहे, माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी मला आर्थिक मदत करावी’, अशी मागणी या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत ५० हजार डॉलर (३५ लाख रुपये) जमवले. अवघ्या १७ दिवसांमध्ये इतकी मोठी रक्कम जमवल्यानंतर अखेर या महिलेचे सत्य समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

दुबई पोलिसांनी या प्रकरणात महिलेला ताब्यात घेतले असून तिचे नाव तसेच ती कोणत्या देशातील आहे यासंदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. या महिलेने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्टच्या माध्यमातून तिने अनेकांना गंडा घातला. लोकांनी दिलेले पैसे गोळा करण्यासाठी या महिलेने सोशल नेटवर्किंग साइट्सवर अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरुन तिने आपल्या मुलांचे फोटो शेअर केले. या फोटोबरोबर दिलेल्या महितीमध्ये तिने या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मागितल्याची माहिती दुबई पोलीसांनी दिली.

या महिलेच्या पतीला आपली पत्नी अशाप्रकारे पैसे गोळा करत असल्याची कल्पना नव्हती. या मुलांना मदत करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याला अनेक मित्र आणि नातेवाईकांनी फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्याला आपल्या मुलांच्या फोटोचा वापरु करुन आपली पत्नी सोशल मिडियाच्या माध्यमातून भीक मागत असल्याचे समजले. या प्रकरणात जेव्हा महिलेला पोलिसांनी अटक केली तेव्हा तिच्या पतीने संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. न्यायालयातही त्याने मुलं माझ्यासोबत राहत असल्याचे पुरव्यासहीत सिद्ध केले. पतीने सादर केलेल्या पुरव्यावरुन ही महिला खोटं बोलत असल्याचे सिद्ध झाले. घरची आर्थिक परिस्थिती योग्य असतानाही नेटकऱ्यांना खोटी माहिती देत पैसे जमवण्यासाठी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुबई पोलिसांनी भीकाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेऊ नका असे आवाहन केले आहे. सोशल नेटवर्किंगवरुन येणाऱ्या प्रत्येक मजकुरावर विश्वास ठेऊ नका असे ट्विट दुबई पोलिसांनी केले आहे.

तसेच भावनिक होऊन रस्त्यावरील तसेच सोशल मीडियावर पैसे मागणाऱ्यांना संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय मदत करु नका असंही दुबई पोलीस खात्यातील प्रमुख अधिकारी असणाऱ्या ब्रिगेडीयर जमला अल सलीम अल जलाफ यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून खोटं बोलून पैसे जमा करणे आणि भीक मागणे हा दुबईतील कायद्यानुसार गुन्हा आहे.