परीक्षेचा पेपर लिहित असतानाच परीक्षा केंद्रात एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना झारखंडमधील गिरीध जिल्ह्यात मंगळवारी घडली. यानंतर तातडीने आई आणि मुलाला जवळच्या नर्सिंग होमममध्ये नेण्यात आले. दोघांचीही प्रकृती उत्तम असून, त्यांना नर्सिंग होममधून डिस्चार्जही देण्यात आला आहे. ‘हिंदूस्थान टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.
धनवाडमधील अदरा महाविद्यालयात शिकणाऱ्या भारती कुमारी गर्भवती होत्या. कला शाखेतील तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी मंगळवारी त्या सारीया महाविद्यालयात आल्या. हे महाविद्यालय त्यांच्या घरापासून सुमारे २५ किलोमीटर लांब आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करेपर्यंत भारती कुमारी यांची तब्येत ठिक होती. पेपर लिहायला सुरुवात केल्यावर अर्धा तासाने त्यांना प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी लगेचच केंद्रातील पर्यवेक्षकांना त्याबद्दल सांगितले. पर्यवेक्षकांनी नजीकच्या नर्सिंग होममध्ये फोन करून तेथील डॉक्टरांना महाविद्यालयात बोलावून घेतले. पण डॉक्टर घटनास्थळी पोहोचण्याच्या आतच भारती कुमारी यांनी बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकेतून या दोघांनाही नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. भारती कुमारी आणि त्यांच्या बाळाला दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक अरूण कुमार यांनी भारती कुमारी आणि त्यांचे बाळ सुखरूप असल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, भारती कुमारी यांना प्रसुतीकळा सुरू झाल्याचे कळल्यावर लगेचच महाविद्यालयातील प्राध्यापिका विनिता कुमारी यांनी त्या वर्गाकडे धाव घेतली. भारती कुमारी यांना दुसऱ्या मोकळ्या खोलीत घेऊन जात असतानाच त्यांनी वाटेतच बाळाला जन्म दिला.