हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. भारतमातेने आपल्या सुपुत्राला गमावले आहे. याचे दुःख काय आहे, हे मी व्यवस्थित समजू शकतो, अशी भावना मोदी यांनी शुक्रवारी लखनऊमध्ये व्यक्त केली.
लखनऊमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्नातकांसमोर केलेल्या भाषणात मोदी यांनी रोहित याच्या आत्महत्येचा विषय काढत त्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, रोहितच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला आहे. ते मी समजू शकतो. भारतमातेने आपल्या सुपुत्राला गमावले आहे. या विषयावरून सुरू असलेले राजकारण एका बाजूला पण एका आईने आपल्या मुलाला गमावले आहे. त्याचे दुःख काय असते, ते मी व्यवस्थित समजू शकतो.
मोजक्या शब्दांत पहिल्यांदाच मोदी यांनी या प्रकरणावर भावना व्यक्त केल्या. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी मोदी यांचे भाषण सुरू होताना त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. सभागृहात उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेचच यामध्ये हस्तक्षेप करीत घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढले.