आईचं मन आपल्या मुलांसाठी कायम झुरत असतं. मुलाला साधं पडसं जरी झालं, तरी तिचा जीव तीळतीळ तुटतो. आणि मुलगा जर अतिशय गंभीर आजाराशी झुंझत असेल, तर मात्र आई आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते. अशीच घटना रशियात घडली आहे. मुलगा आजारातून पूर्ण बरा झाला, तर दिव्यांग अनाथ मुलांना दत्तक घेईन, अशी शपथ एका आईने घेतली होती. मुलगा बरा झाल्यावर तिने आपला शब्द तर पाळलाच, पण त्या बरोबरच चक्क ८ दिव्यांग मुलं दत्तक घेतली.

रशियाच्या दक्षिण भागात राहणारी मॅडिकेट शाखबुलतोव्हा या महिलेचा मुलगा रमझान एका गंभीर आजाराने त्रस्त होता. एका स्थानिक कार्यालयात काम करताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक होती. तब्बल सहा महिने रमझान तशाच परिस्थिती होता. तो बरा होणार की नाही, याबाबत त्याची आई अत्यंत चिंतातूर होती. त्यावेळी माझा मुलगा पूर्ण बरा झाला, तर दिव्यांग अनाथ मुलांना दत्तक घेईन, अशी शपथ तिने घेतली आणि पाहता पाहता रमझानच्या प्रकृतीत सुधारणा होत तो पूर्ण बरा झाला.

रमझान पूर्ण बरा झाल्यावर मॅडिकेटने एकूण ८ दिव्यांग मुलं दत्तक घेतली. प्रसारमाध्यमाला माहिती देताना मॅडिकेट म्हणाली की सुरुवातीला मी तीन मुलं दत्तक घेतली. ते माझ्याबरोबर खुश आहेत, हे मला त्यांच्या प्रतिक्रियांवरून समजले. तीन महिन्यांनी आम्ही आणखी तीन मुलं दत्तक घेतली. त्यानंतर एक मुलगी आणि एक लहान मुलं दत्तक घेतलं.

दत्तक घेतलेली सगळी मुलं दिव्यांग असून त्यांच्याकडे मला विशेष लक्ष पुरवावं लागतं. प्रत्येक गोष्ट कशी करावी, हे त्यांना मला समजवावं लागतं. पण मी त्या सगळ्यांबरोबर खूप आनंदात आहे. पुन्हा अनाथाश्रमात जायला आवडेल का? असं त्या मुलांना विचारले तर ते सरळ नाही सांगतात. आम्हाला आमच्या आईबरोबर राहायचं आहे, हे त्यांचं उत्तर मनाला सुखावणारं असतं, असंही मॅडिकेटने सांगितलं.