‘मोटर व्हेइकल अॅक्ट 2019’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर वाहनचालकांची झोप उडाली होती. अतापर्यंत हा कायदा महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये लागू करण्यात आला नव्हता. परंतु गुजरात सरकारने आता नियमांमध्ये थोडा बदल करत हा कायदा लागू केला आहे. गुजरात सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नव्या दंडाच्या रकमेबाबत घोषणा केली. पोलिसांनी विना हेलमेट पकडल्यास नव्या नियमांनुसार आकारल्या जाणाऱ्या 1 हजार रूपयांऐवजी गुजरातमध्ये 500 रूपये आकारण्यात येणार आहे. तर सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास 1 हजार रूपयांऐवजी 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त धोकादायकरित्या वाहन चालवल्यास नव्या नियमांनुसार 5 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पंरतु यासाठी गुजरातमध्ये तीन तारी वाहनांकडून 1 हजार 500, हलक्या वाहनांसाठी 3 हजार रूपये आणि अन्य वाहनांसाठी 5 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.

1 सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध करण्यात आला होता. तसेच वाहनचालकांमध्ये पसरलेली नाराजी पाहता गुजरात सरकारने दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.