चीनमधील संस्थांचे संशोधन

माउंट एव्हरेस्ट हा उंच पर्वत गेल्या पन्नास वर्षांत जास्त तापला असून तेथील हिमनद्या वितळून आकुंचन पावत आहेत, असे चीनच्या संशोधनात म्हटले आहे. गेल्या चाळीस वर्षांत हिमनद्यांचे २८ टक्के आकुंचन झाले आहे. ८८४४ मीटर उंचीच्या माउंट एव्हरेस्ट पर्वताला तिबेटमध्ये ‘माउंट कोमोलंगमा’ असे म्हटले जाते. तेथील हिमनद्या आकुंचन पावत असून वितळल्याने त्यांचे पाणी खाली नद्यांमध्ये जात आहे, असे चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, हनान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, माउंट कोमोलांगमा स्नो लिओपार्ड कन्झर्वेशन सेंटर (हिमबिबटया संवर्धन केंद्र ) यांनी हे संशोधन केले आहे.
या भागातील परिसंस्थात्मक वातावरण मात्र जंगलांमुळे चांगले आहे. गेल्या महिन्यात इन्स्टिटय़ूट ऑफ तिबेटन प्लॅटू रीसर्च ( तिबेट पठार संशोधन संस्था) या संस्थेने म्हटले आहे की, तिबेट हे जगाचे छप्पर मानले जाते, ते हिमनद्या वितळत असल्याने धोक्यात आले आहे. वाढते तापमान व मानवी क्रियाशीलतेमुळे तेथे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. तिबेटच्या पठारावरील विसाव्या शतकातील हिमनद्या तापमान वाढल्याने १९९० पासून वेगाने वितळत आहेत. तिबेट पठारावरील हिमनद्या नष्ट होण्याचे हे प्रमाण जास्त असले तरी आग्नेय तिबेटमध्ये हिमनद्या स्थिर आहेत. काराकोरम, पश्चिम कुनलुन भाग येथे हिमनद्या अवक्षेपामुळे टिकून राहत आहेत. तिबेट पठारावर नैसर्गिक आपत्ती येत आहेत त्याला जागतिक तापमानवाढ हे कारण आहे. काही ठिकाणी हिमवर्षांव तर काही ठिकाणी दरडी कोसळतात, वणवे पेटतात. तिबेटच्या पठारावर सरोवरांचा भाग वाढला आहे. एकूण सरोवरांचे क्षेत्र १९७० मध्ये १०८१ चौरस किलोमीटर होते ते २०१० मध्ये १२३६ चौरस किलोमीटर झाले व ही वाढ ८० टक्के आहे. अहवालात म्हटल्यानुसार पठारावर जंगलही वाढले आहे. १९९७ मध्ये ते ७.२९ दशलक्ष हेक्टर होते ते २०१३ मध्ये १४.७२ दशलक्ष हेक्टर झाले. पाण्याचा साठा अनुक्रमे २.०९ अब्ज घनमीटर होता तो २.२६ अब्ज घनमीटर झाला, वनसंवर्धनामुळे हा सकारात्मक परिणाम झाला आहे. तिबेट पठाराची सरासरी उंची ४५०० मीटर असल्याने तो तिसऱ्या ध्रुवाचा गाभा आहे व ते चीनच्या
तिबेट स्वायत्त भागात वसलेले आहे.