दिल्लीतील  १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणावर  बीबीसीने तयार केलेल्या ‘इंडियाज डॉटर’  वृत्तपटावर घातलेली बंदी फार काळ टिकणार नाही, असे या वृत्तपटाच्या निर्मात्या- दिग्दर्शक लेस्ली उदविन यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, आपल्या मते ही बंदी फार काळ टिकणार नाही कारण भारतातील न्यायालये म्हणजे सरकारच्या हातातले बाहुले आहेत.
भारत हा लोकशाही देश आहे व आता या वृत्तपटावर बंदी घातली असली तरी सुसंस्कृत देश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक आधारस्तंभ असतो तोच या बंदीमुळे डळमळीत झाला आहे. ही बंदी तात्पुरती आहे, नागरी मूल्ये परत येतील व ही बंदी उठवावी लागेल. नंतर त्याबाबतचा उन्माद कमी होईल तेव्हा महिलांच्या संरक्षणाबाबत कुठलीही शरमेची बाब न लपवता योग्य तो संदेश समाजापर्यंत जाईल.
दरम्यान, अमेरिकेत या वृत्तपटाचे पहिले प्रदर्शन झाले त्यावेळी ऑस्कर अभिनेत्री मेरिल स्ट्रीप व फ्रिडा पिंटो तसेच भारतीय अभिनेते निर्माते फरहान अख्तर व त्याची पत्नी उपस्थित होते. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याने या वृत्तपटातील मुलाखतीत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत व त्याला पश्चात्ताप झाला नसल्याचे दिसत आहे. राजकीय नेते एखाद्या बलात्कारितेबाबत जी वक्तव्ये करतात त्यापेक्षा मुकेश सिंहने केलेली वक्तव्ये वेगळी नाहीत. राजकारणी लोक जे रोज बोलतात तेच तो म्हणाला आहे, ते समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, तेच यातून शिकायचे आहे. महिलांविरोधातील गुन्हे भारतातच होतात असे दाखवण्याचा आमचा यात प्रयत्न नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, उलट आपण यात भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे कारण या पीडितेच्या बाजूने समाज एक महिना लढत होता, त्यात सामान्य माणसे होती.  जर दुसरीकडे अशा कारणासाठी निदर्शने झाली असती तर मी तेथे जाऊन वृत्तपट केला असता. आपण आदराचा दृष्टिकोन ठेवूनच भारतात आलो होतो व तो आदर त्या मुलीच्या बाजूने लढणाऱ्यांबाबत होता.