राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष राहिलेल्या आणि नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने या कायद्यांविरोधात आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी अकाली दलाने केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध प्रादेशिक पक्षांसोबत राष्ट्रीय आघाडी करण्याची घोषणा केली.

अकाली दलाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार प्रा. प्रेमसिंग चंदूमाजरा म्हणाले, “नुकतेच मंजूर झालेले तीन कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सुरु असलेलं आंदोलन टिकून रहावं यासाठी शिरोमणी अकाली दल प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी तयार करणार आहे. राष्ट्रीय आघाडीसाठी देशभरातील पक्षांना आमंत्रित करण्यात येणार असून याद्वारे मोठी चळवळ उभी राहिल.” पंजाबमध्ये सोमवारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ते एका कार्यक्रमात बोलत होते.

आणखी वाचा- NDA फक्त नावाला, इतक्या वर्षात पंतप्रधानांनी बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्याने अकाली दलाचं अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अभिनंदन करीत पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार या नेत्यांचा समावेश आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी एकच व्यासपीठ तयार करायला हवं असंही प्रा. चंदूमाजरा यांनी म्हटलं आहे.