अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटॉल हिलमधील हिंसाचारास उत्तेजनाच्या कारणास्तव महाभियोग चालवण्यासाठी कायदा संमत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत, असे अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांनी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही आवाहन केले असून मंत्रिमंडळाने घटनात्मक अधिकारांचा वापर करून त्यांना पदावरून दूर करावे असे पलोसी यांचे मत आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की पहिल्या उपायाचा भाग म्हणून माइक पेन्स यांना २५ व्या घटनादुरुस्तीतील अधिकारांचा वापर करून ट्रम्प यांना काढण्यास राजी करण्यासाठी मतदान घेण्यात येईल. याला पर्याय म्हणून महाभियोगाची कारवाईही ट्रम्प यांच्यावर करता येऊ शकते व तसे झाल्यास महाभियोगाच्या माध्यमातून काढण्यात आलेले ते पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरतील.

राज्यघटना व लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही तातडीने पावले उचलण्यास तयार आहोत. ट्रम्प यांच्या वर्तनाने लोकशाही व राज्यघटना या दोन्हींना धोका निर्माण झाला आहे.

सोमवारी पलोसी यांच्या चमूने सांगितले, की सध्या प्रतिनिधिगृहाचे अधिवेशन चालू नसल्याने या प्रस्तावास आक्षेप येऊ शकतो. त्यामुळे मंगळवारी पलोसी या हा प्रस्ताव मंगळवारी पूर्ण सभागृहाच्या अधिवेशनात मांडू शकतात. तो संमत करण्यासाठी पेन्स व मंत्रिमंडळ यांना २४ तासांचा अवधी द्यावा लागेल. त्या मंजुरीनंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल होईल.

ट्रम्प यांच्यावर २० जानेवारीपूर्वीच पद सोडण्यासाठी दबाव वाढला आहे. रिपब्लिकन सेनेटर पॅट टुमी यांनी रविवारी ट्रम्प यांनी राजीनामा देण्याच्या अलास्कातील प्रतिनिधी लिसा मुर्कोवस्की यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.