07 December 2019

News Flash

कुठलेही सरकार असले तरी भारताचा विकास जोमानेच

जागतिक आर्थिक मंचावर कमलनाथ यांचा दावा

| January 24, 2019 03:07 am

संग्रहित छायाचित्र

जागतिक आर्थिक मंचावर कमलनाथ यांचा दावा

दावोस : देशात कुठलेही सरकार असले तरी आर्थिक विकास तेवढय़ाच जोमाने होऊ शकतो हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. असे असले तरी आर्थिक वाढीचा सर्वसमावेशक विस्तार करण्याची नितांत गरज आहे. सध्या देशात बेरोजगारी व शेतकऱ्यांची दुरवस्था हे दोन मोठे गंभीर प्रश्न आहेत, असे काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी येथे सांगितले.

बाजारपेठेचा उदयोन्मुख चेहरा या विषयावर जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सरकार कुठलेही असले, त्यांची धोरणे काहीही असली तरी भारताचा आर्थिक विकास होतच राहिला आहे. त्यात महत्त्वाकांक्षी तरुण पिढीचा मोठा वाटा आहे. वाढती बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र गंभीर आहेत. कुठलाही धोरणात्मक निर्णय घेताना त्यातून भारताच्या मोठय़ा क्षमतेला वाव मिळेल याचा विचार केला गेला पाहिजे. शाश्वत आर्थिक वाढ महत्त्वाची असताना तो देशात राजकीय प्रश्न म्हणून पुढे आणला गेला नाही. तो देशातील राजकीय प्रश्न आहे. त्याच बरोबर पर्यावरणाचे प्रश्नही देशासमोर आहेत. ऑक्सफॅमने देशातील विषमतेबाबत दिलेली आकडेवारी चिंताजनक असून ती दूर करण्याची गरज आहे. ऑक्सफॅमच्या २०१८च्या अहवालानुसार देशातील १ टक्के लोक ३९ टक्क्यांनी श्रीमंत झाले तर तळाकडील लोकांची संपत्ती केवळ ३ टक्क्यांनी वाढली आहे. १३.६ कोटी भारतीय २००४ पासून कर्जाच्या सापळय़ात असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. अमेरिकेतील विषमता व भारतातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळे आहेत.

देशांतर्गत उत्पन्न हा शोभेचा आकडा

एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा आकडा हा आता शोभेचा आकडा झाला आहे. आर्थिक वाढीचा दर काहीही असला तरी प्रत्यक्षात त्याचे प्रतिबिंब मानवी कल्याणात दिसले पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही असे सांगून ते म्हणाले, की देशातील कृषी क्षेत्र संकटात आहे, त्यामुळे आम्ही मध्य प्रदेशात दिलेली कर्जमाफी योग्यच आहे. एकूण देशांतर्गत उत्पन्न हा आता शोभेचा आकडा झाला आहे. जर ७.५ विकास दर असेल तर तो लोकांच्या कल्याणात परिवर्तित झालेला का दिसत नाही असा प्रश्न पडतो.

First Published on January 24, 2019 3:07 am

Web Title: mp chief minister kamal nath at world economic forum in davos
Just Now!
X