उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात पक्षाच्या एका दलित खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. रॉबर्ट्सगंज मतदारसंघाचे खासदार छोटेलाल यांनी मुख्यमंत्र्यांनी खरडपट्टी काढल्याचा दावा पत्रात केला आहे. पंचायत प्रमुख असलेल्या छोटेलाल यांच्या भावाविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. याला काही भाजपा नेत्यांनी साथ दिली असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे व सरचिटणीस सुनील बन्सल यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनाही दोनदा भेटलो उलट त्यांनी खरडपट्टी काढून बाहेर काढले असा आरोप छोटेलाल यांनी केला आहे. तर एका विरोधकाने जातीच्या नावे धमकावले. आता पंतप्रधानांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी छोटेलाल यांनी मोदींकडे केली आहे.

छोटेलाल यांनी पत्रात दावा केला आहे की, सपा-बसपाबरोबर भाजपाच्या नेत्यांनी आपल्या भावाला पदावरून हटवले आहे. आमच्यावर हल्ला करण्यात आला. मी याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांकडे केली. पण मला कोणाचेही सहकार्य मिळाले नाही. भाजपाचे स्थानिक नेते आपल्याविरोधात कट रचत आहेत. त्यांना योगी सरकारचे संरक्षण आहे. जेव्हा राज्यात सपाची गुंडगिरी होती. तेव्हाही भावाला निवडून आणले. पण आज आपल्याच पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. पण दखल घेतली जात नाही. याबाबत प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे आणि सुनील बन्सल यांची भेट घेऊन समस्या सांगितली. दोन्ही नेत्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण काहीच केले नाही, असे छोटेलाल यांनी म्हटले आहे.

योगी सरकारविरोधात नाराजी प्रकट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाजपाच्या दलित खासदार सावित्रीबाई फुले आणि मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली होती.