मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या आणि मोझरबेअर कंपनीचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्याच्यावर 300 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच रतुल पुरी आणि अन्य दोन जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. सेट्रल बँक ऑफ इंडियाकडून 354 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रतुल पुरीला 20 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. परंतु आज त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणात रतुल पुरी, त्याचे वडिल दिपक पुरी, आई निता पुरी, संजय जैन, विनित शर्मा आणि कंपनी एमबीआयएलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर फसवणूक, कथितरित्या गुन्हेगारीचा कट आणि भ्रष्टाचारासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, 2012 मध्ये रतुलने कंपनीच्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याचे आई-वडिल हे संचालक मंडळावर कार्यरत होते, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. सीबीआयने सोमवारी त्यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाची तक्रार केली होती. पुरी यांची कंपनी 2009 पासून निरनिराळ्या बँकांकडून कर्ज घेत होती. तसेच वेळोवेळी कर्ज भरण्याच्या अटींमध्येही कंपनी बदल करून घेत होती, असे बँकेकडून सांगण्यात आले. 20 एप्रिल 2019 रोजी एका फॉरेन्सिक ऑडिटनंतर बँकेने कंपनीचे खाते बनावट असल्याचे घोषित केले होते. तसेच कंपनी आणि कंपनीच्या संचालकांनी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले. यापूर्वी 3 हजार 600 कोटी रूपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही रतुल पुरीचे नाव आले होते.