मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही. परंतु, राज्यात शाब्दिक युद्ध रंगायला सुरूवात झाली आहे. गुरूवारी चित्रकूट येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ‘योजना मशीन’ ची उपमा देत काँग्रसेची सत्ता आल्यास ‘मेड इन चित्रकूट’चे मोबाइल पाहायला मिळतील असे आश्वासन दिले होते. त्यावर शिवराजसिंह यांनी लगेच प्रत्युत्तर दिले असून राहुल यांना मागील ७० वर्षांत ‘मेड इन अमेठी’ लिहिलेला बारीक पिनचा चार्जरही बनवता आला नसल्याचा टोला लगावला आहे.

मी अशा योजना तयार करतो. ज्यामुळे माझ्या मुलींचा विवाह होईल, आदिवासी भाऊ-बहिणींच्या पायात बूट-चप्पल येते, प्रत्येक मुलगी लाडली लक्ष्मी असते. २०० रूपयांमध्ये घरात वीज येते. ही यादी खूप मोठी आहे. माझ्या योजनांचे कौतुक केल्याबद्दल राहुलजी तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या मेड इन चित्रकूट वक्तव्याची खिल्ली उडवली.

ते म्हणाले, मेड इन मध्य प्रदेश मोबाइल, मेड इन चित्रकूट मोबाइल, भेलचे मोबाइल, माहीत नाही राहुलजी आणखी कुठे कुठे मोबाइलची फॅक्टरी सुरू करणार आहेत. राहुलजी आज भलेही काहीही बोलत आहेत. पण सत्य हे आहे की, मागील ७० वर्षांमध्ये ‘मेड इन अमेठी’ असे लिहिलेला ‘बारीक पिनचा चार्जर’ही ते बनवू शकलेले नाहीत.

चला, राहुलजींनी मला योजना मशीन म्हटले आहे. पण आता त्यांना हेही सांगा की मी अशा योजना देतो की ज्यामुळे मध्य प्रदेशची प्रगती होत आहे. शेतकरी खूश आहे, गरिबांचे पोट भरत आहे, त्यांच्या घरात प्रकाश आला आहे, त्यांची मुले शाळा-महाविद्यालयात जात आहेत, असेही चौहान यांनी म्हटले.