26 February 2021

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या मोडलेल्या झोपेची कहाणी; आधी डास चावले, नंतर मोटारीसाठी धावले!

सामान्यांप्रमाणेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रशासनाच्या अनास्थेचा फटका बसू शकतो यावर विश्वास बसणार नाही ना? पण हे झालंय!

आपल्यापैकी प्रत्येकालाच सरकारी कामाचा, त्याच्या दर्जाचा, त्यातल्या दिरंगाईचा कधी ना कधी अनुभव आला आहे. आपल्या घराच्या आसपासच्या स्वच्छतेबाबत तर नेहमीच आपण पालिका किंवा सरकारी कर्माऱ्यांच्या नावाने तक्रार करत असतो. सरकारी अधिकारी किंवा नेतेमंडळी स्वत: आरामात राहतात आणि सामान्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिलं जातं, अशी तक्रार जवळपास प्रत्येकाचीच असते. पण खुद्द मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाच या अनागोंदी सरकारी कारभाराचा फटका बसला आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या रात्रीच्या झोपेचं देखील खोबरं झालं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी थेट अभियंत्याला निलंबित करून टाकलं!

नेमकं झालं काय?

तर झालं असं, की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशच्या सिधी भागात दौऱ्यावर गेले होते. या परिसरात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण बस दुर्घटनेच्या अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. दौरा आटोपल्यानंतर शिवराजसिंह चौहान संध्याकाळी सिधीमधल्या सर्किट हाऊसवर मुक्कामी थांबले होते. मुख्यमंत्री तिथे विश्रामासाठी जाणार हे आधीच सांगितल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि अभियंत्र्यांनी सर्किट हाऊसवर सर्व व्यवस्था करून ठेवणं अपेक्षित होतं. पण झालं उलटंच!

पाण्याची मोटार बंद करायला मुख्यमंत्रीच उठले!

भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सर्किट हाऊसच्या आसपास मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्यामुळे सर्किट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचा वावर होता. डास चावत असल्यामुळे मुख्ममंत्री शिवराजसिंह चौहान यांना झोपच लागेना. शेवटी रात्री २ वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. डास मारण्याचं औषध खोलीत मारून झाल्यानंतर ते पुन्हा झोपले. जरा डोळा लागला असतानाच सर्किट हाऊसच्या वरची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली आणि मोठा आवाज करत पाणी खाली पडू लागलं. पुन्हा मुख्यमंत्र्यांची झोप मोडली!

Shivraj singh Chauhan mosquitoes letter

मोडलेल्या झोपेची कहाणी!

शेवटी मुख्यमंत्री स्वत:च टाकीची मोटार बंद करण्यासाठी उठले. इतकं होईपर्यंत संपूर्ण सिधीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मोडलेल्या झोपेची कहाणी पोहोचली होती. अधिकाऱ्यांच्या पाचावर धारण बसली होती. शेवटी झोप न झालेल्या अवस्थेत शिवराज सिंह चौहान भोपाळला परतले. पण याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्याच दिवशी संबंधित जबाबदार अभियंता बाबूलाल गुप्ताला निलंबित करण्यात आले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील खुलासा मागवण्यात आला.

अभिनेते नाना पाटेकर यांनी यशवंत सिनेमामध्ये मारलेला ‘एक मच्छर…’ डायलॉग आजही लोकांच्या डोक्यात फिट्ट आहे. पण या घटनेच्या निमित्ताने सिधीमधील प्रशासनाला ‘एक मच्छर आपको सप्सेंड भी कर सकता है’, असं म्हणायची वेळ आली असेल, याची दाट शक्यता आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:54 pm

Web Title: mp cm shivraj singh chauhan spend sleepless night mosquitoes engineer suspended pmw 88
Next Stories
1 “भाजपा सरकारने आठवड्यातील त्या दिवसाचं नाव ‘अच्छा दिन’ करायला हवं”
2 धडकी भरवणारी आकडेवारी; २७ दिवसांनंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या १४ हजारांवर
3 पँगाँगमधून चीन मागे हटला, पण देप्सांगचं काय?; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला सवाल
Just Now!
X