चारशे मुलांचा जीव वाचवण्यासाठी जिवंत बॉम्ब हातात घेऊन स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या मध्य प्रदेशमधील पोलिसाचा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गौरव केला आहे. अभिषेक पटेल असे या धाडसी पोलिसाचे नाव असून त्यांनी जिवंत बॉम्ब हातात घेऊन जवळपास एक किलोमीटर अंतर कापले. पटेल यांनी जर प्रसंगावधान राखले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र स्वत:च्या प्राणाची बाजी लावत अभिषेक पटेल यांनी चारशे मुलांचा जीव वाचवला.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस देऊन अभिषेक पटेल यांचा सन्मान केला. यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना, माझ्या एकट्याच्या जीवापेक्षा चारशे जणांचा जीव मला महत्त्वाचा वाटला, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील चितोरा गावातील एका शाळेत जिवंत बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांनी दाखवलेल्या धाडसामुळे या सगळ्या मुलांचा जीव वाचला. अभिषेक पटेल यांच्या शौर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील व्हायरलदेखील झाला.

चितोरा गावातील शाळेत बॉम्ब सापडल्याची माहिती १०० या क्रमांकावर पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांना मिळाली होती. त्यानंतर ते तातडीने शाळेत पोहोचले. त्यावेळी शाळेत सुमारे ४०० मुले असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आता इतक्या सगळ्या मुलांचा जीव कसा वाचवायचा हा त्यांच्या पुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. पटेल यांनी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला याबद्दलची माहिती दिली. मात्र हे पथक येण्यास बराच वेळ लागणार होता.

चारशे मुलांचा जीव संकटात सापडल्यामुळे अभिषेक पटेल यांनी स्वत:च बॉम्ब घेऊन तो शक्य तितक्या लांब नेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी हा बॉम्ब आपल्या खांद्यावर घेतला आणि ते धावत सुटले. या बॉम्बचे वजन १० किलो आणि लांबी १२ इंच इतकी होती. एवढ्या वजनाचा बॉम्ब फुटला तर ५०० मीटर परिसरात त्याचा परिणाम होतो, असे अभिषेक यांना सांगण्यात आले होते. म्हणूनच त्यांनी बॉम्ब उचलला आणि ते सुमारे १ किलोमीटर लांब धावत गेले.

आपण बऱ्यापैकी अंतर कापले आहेत, हे लक्षात येताच तातडीने अभिषेक पटेल यांनी हा बॉम्ब फेकून दिला. ते धावत असताना त्यांच्या टीमचे सदस्य त्यांना बॉम्ब लगेच फेकून दे आणि लांब पळ, असे सांगत होते. कारण हा बॉम्ब जर अभिषेक पटेल यांच्या हातात असताना फुटला असता, तर त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या असत्या. मात्र अभिषेक पटेल यांनी काहीही ऐकले नाही आणि ते एक किलोमीटर धावत गेले. तिथे मोकळ्या जागेत गेल्यावर त्यांनी हा बॉम्ब फेकला आणि त्यामुळे ४०० मुलांचा जीव वाचला.