उत्तर प्रदेशातील सोनभद्र हत्याकांडाती दहा मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शनिवारी टीएमसी खासदारांचे प्रतिनिधीमंडळ सोनभद्र येथे जाण्यासाठी वाराणसीत पोहचले होते. त्यांना येथून पिडीत कुटूंबीयांच्या भेटीसाठी जायचे होत, मात्र या अगोदर उत्तर प्रदेश पोलिसांनी टीएमसीच्या या संसद  सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळास वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, बाबतपूर येथे अडवत ताब्यात घेतले.

टीएमसीचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वात सुनील मंडल, अबीर रंजन बिस्वास असे तिघेजण सोनभद्र येथे निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना सोनभद्र येथे कलम १४४ लागू करण्यात आले असल्याचे सांगत वाराणसीतच अडवल्याने त्यांनी विमानतळाबाहेरच धरणे आंदोलना सुरू केले आहे.

याबाबत डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, एडीएम आणि एसपी यांनी सांगितले की, आम्हाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आम्ही सांगितले की, कलम १४४ नुसार चार पेक्षा अधिकजण एकत्र येऊ शकत नाहीत. आम्हीतर तिघेजणच असल्याने आम्ही कोणत्याही कलमाचे उल्लंघन करत नाही. आम्ही हा मुद्दा लोकसभेत उचलणार आहोत, पण सध्या आता आमचे धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.