करोनाची लागण झालेल्यांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर, नर्स आपआपल्या कुटुंबियांपासून दूर राहतायेत. घरातील कोणाला संसर्ग होऊ नये या भीतीमुळे काही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी रुग्णालयातील ड्युटी संपल्यानंतरही घरी जात नाहीत. भोपाळच्या जे.पी. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने तर स्वतःच्या कारलाच घर बनवलंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या डॉक्टरला सलाम ठोकलाय.

सचिन नायक असे या डॉक्टरांचे नाव आहे. जे.पी. हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलंय. तासनतास काम केल्यानंतरही ते आपल्या घरी जात नाहीयेत. उलट त्यांनी आपल्या कारलाच घर बनवलंय. स्वतःच्या पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याचं डॉक्टर नायक सांगतात. डॉक्टर नायक यांनी कारमध्ये गरजेच्या सर्व वस्तू ठेवल्या असून गेल्या सात-आठ दिवसांपासून त्यांनी आपल्या कारमध्येच स्वतःचं घर थाटलंय. कुटुंबाला करोना संसर्गापासून वाचवण्यासाठी त्यांनी गाडीलाच घर बनवून तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन नायक यांना तीन वर्षाचा लहान मुलगा आहे. सोशल मीडियावर सचिन नायक यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही  त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

“करोनाविरोधात लढणाऱ्या तुमच्यासारख्या योद्ध्यांचं मी आणि संपूर्ण मध्य प्रदेशची जनता अभिनंदन करते. असाच संकल्प ठेवून जर आपण पुढे जात राहिलो तर करोनाविरोधातील हे महायुद्ध आपण नक्की जिंकू….तुमच्या निष्ठेला सलाम”, अशा आशयाचं ट्विट करत मुख्यमंत्री चौहान यांनी डॉ. सचिन नायक यांचं कौतुक केलं आहे.


डॉ. सचिन नायक हे रुग्णालय परिसरातच गेल्या 7-8 दिवसांपासून कारमध्ये वास्तव्य करून राहतायेत.