मध्य प्रदेशमध्ये  काँग्रेसची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सरकारी इमारतींमध्ये शाखा भरवण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेत जाण्यास देण्यात आलेली सूट ही मागे घेण्यात येणार आहे. मध्य प्रदेशमध्ये दीर्घकाळापासून भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. तिथे सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्याची मुभा सरकारने दिलेली आहे. तसेच सरकारी कार्यालयात संघाच्या शाखाही भरतात. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात या मुद्याला महत्व दिले आहे.

काँग्रेस पक्षाने शनिवारी मध्य प्रदेश निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने हिंदु मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. भगवान रामाशी संबंधित राम पथ विकास, नर्मदा नदीचे संरक्षण आणि गोमूत्र, गोशाळा आदींचा उल्लेख केला आहे.

काँग्रेसने राज्यात एक आध्यात्मिक विभाग सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संस्कृत भाषेचा प्रचारही करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गोशाळा सुरु करण्याचा तसेच जखमी गायींवर उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी वीज बिलावर ५० टक्के सूट तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना ३ वर्षांपर्यंत १० हजार रुपये देणे, राज्यात अडीच लाख घरे निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवराजसिंह सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘वचनपत्र’ असे नाव दिले आहे.