मध्य प्रदेशातील ‘व्यापम’ घोटाळ्याप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या ‘एफआयआर’मध्ये राज्यपाल राम नरेश यादव यांचे नाव आल्याने त्यांना पदत्याग करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले असतानाही ते झुगारून यादव अद्यापही पदत्याग करण्यास तयार नाहीत.
यादव गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तथापि मुखर्जी यांची भेट न झाल्याने ते मंगळवारी भोपाळमध्ये परतले. सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी यादव येथे आले होते.
‘एफआयआर’मध्ये नाव आल्याने यादव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला होता. विवाह समारंभाला हजेरी लावण्यासाठीच ते केवळ बाहेर पडले, उर्वरित दिवस ते मध्य प्रदेश भवनमध्येच तळ ठोकून होते.
दरम्यान, यादव यांच्या या कृतीमुळे मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.