मध्य प्रदेशात एका मद्य सम्राटाने कुटुंबातील फक्त चार व्यक्तींना भोपाळहून दिल्लीला आणण्यासाठी एअरबस ए ३२० हे आलिशान विमान भाडयावर घेतल्याचं समोर आलं आहे. मुलगी, दोन नातवंड आणि त्यांची आजी अशा चौघांच्या भोपाळ ते दिल्ली प्रवासासाठी एअरबस ए ३२० विमान भाडयावर घेतले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सध्या करोना व्हायरसमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. लॉकडाउनमुळे अर्थचक्र ठप्प असल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. या सर्व परिस्थितीत एका मद्यसम्राटाने फक्त चौघांसाठी आलिशान विमान बुक केले होते.

एअरबस ए ३२० या विमानाची १८० प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे. जेव्हा या मद्य सम्राटाशी फोनवरुन संपर्क साधला, तेव्हा त्याने सुरुवातीला विमान भाडयावर घेतल्याचे नाकारले व फोन कट करण्यापूर्वी ‘तुम्ही व्यक्तीगत गोष्टींमध्ये कशाला ढवळाढवळ करताय?’ असा उलटा सवाल केला.

एअरबस ए ३२० हे विमान दिल्लीमधून भाडयावर घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी ९.३० वाजता या विमानाने दिल्लीवरुन उड्डाण केले. १०.३० च्या सुमारास ते भोपाळमध्ये पोहोचले व तिथून चार जणांना घेऊन उड्डाण केल्यानंतर ११.३० वाजता हे विमान पुन्हा दिल्लीत पोहोचले.

हवाई क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, सहा-आठ आसनी विमान सुद्धा उपलब्ध होते. पण या उद्योजकाने एअरबसची निवड केली. “ज्यांच्याकडे पैसा आहे. ते दुसऱ्या प्रवाशांसोबत प्रवास करणे टाळतात, कारण त्यात धोका आहे. पण सहा-आठ आसनी विमान उपलब्ध आहे” असे सूत्रांनी सांगितले. एअरबस ए३२० हे विमान भाडयावर घेण्याचा प्रत्येक तासाचा खर्च पाच ते सहा लाख रुपये आहे असे सूत्रांनी सांगितले. चौघांना भोपाळहून दिल्लीला आणण्यासाठी या मद्य सम्राटाने २५ ते ३० लाख रुपये खर्च केले असावेत, असा अंदाज हवाई क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला.