मध्यप्रदेशातील ४३ नगराध्यक्ष,  नगरसेवक तसेच ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत २६ नगराध्यक्षपदांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला १४ नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे. इतर तीन नगराध्यपदांवर अपक्षांनी विजय मिळवला. नगराध्यक्षपदासाठी १६१ उमेदवार मैदानात होते. नगरसेवकपदासाठी २ हजार १३३ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणूकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष काँग्रेस एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. त्यामुळे या निवडणूका प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. मात्र, यात भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत मोठे यश मिळवले आहे.

येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ११ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले होते. यामध्ये ८ लाख मतदारांनी आपला मताधिकार वापरला होता. तसेच सध्या ५ हजार ६३१ पंच, ७४ सरपंच, १४ स्वीकृत पंचायत सदस्य, ३ जिल्हा पंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणूका, ३५६ पंच आणि २३ सरपंच पदांसाठी मतमोजणी सुरु आहे.

या निवडणुकांमध्येही भाजपने मोठा विजय मिळवल्यास पक्षासाठी मध्यप्रदेशातील या मिनी विधानसभा निवडणुकांतील कामगिरी मोठी उत्साह वाढवणारी ठरणार आहे.