दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेवर सोमवारी संसदेत मोठा गदारोळ उठला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी तहकूब करावे लागले. स्वस्तातील लोकप्रियता मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना लागू केल्याचे मत खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी शून्यकाळात व्यक्त केले. या योजनेमुळे मध्यमवर्गीय हैराण असून स्त्रिया आणि मुलांना त्रास होत असल्याचे सांगत, त्यांनी केजरीवाल हे सायको मुख्यमंत्री असल्याची टीका केली.
काही महिन्यांपूर्वी केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड पडली होती, तेव्हा केजरीवाल यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अशाच स्वरुपाच्या शब्दांचा वापर केला होता. दरम्यान, दिल्लीतील सम-विषम योजनेमुळे केवळ पप्पू यादव नाराज नसून, राज्यसभेतील सदस्य नरेश अग्रवाल यांनीदेखील संताप व्यक्त केला. सम-विषम ही योजना खासदारांना अपमानित करण्यासाठी लागू केल्याचे मत व्यक्त करत, केंद्र सरकार यावर गप्प का आहे, याबाबत नरेश अग्रवाल यांनी आश्चर्य व्यक्त केले.
ही योजना खासदारांच्या कामाच्या आड येत असल्याचे मत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. सोमवारी काही खासदारांकडून दिल्लीतील सम-विषम योजनेचा भंग झाला होता. यात अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनादेखील दंड भरावा लागला होता. यावर परेश रावल यांनी टि्वटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल आणि दिल्लीकरांची माफी मागितली होती.