मध्यप्रदेशातल्या शेतकरी आंदोलनात एका ८० वर्षांच्या वृद्धेला पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कमलाबाई असे या महिलेचे नाव आहे. त्यांना आणि त्यांच्या ८३ वर्षांच्या पतीला पोलिसांनी मारहाण केली आहे. मध्यप्रदेशातल्या सिहोरमधली ही घटना आहे. या मरहाणीत कमलाबाईंचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पोलिसांच्या या मुजोरीची जबाबदारी मध्यप्रदेश सरकार घेणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मला ज्या पोलिसांनी मारहाण केली ते माझ्या नातवांच्या वयाचे आहेत. त्यांना भेटून मला विचारायचे प्रश्न करायचा आहे की मला मारहाण नेमकी का करण्यात आली? असेही कमलाबाई यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. काही आंदोलक आमच्या घराजवळ असलेल्या वऱ्हांड्यात आले आणि पळून गेले. त्यानंतर काही पोलीस या ठिकाणी आले त्यांनी काहीही विचारपूस न करता थेट मला मारहाण करण्यास सुरूवात केली. माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. तरीही मला मारहाण करण्यात आलीये. मी माझ्या घरामधे, माझे पती आणि नातवांसोबत बसले होते. तेव्हा पोलिसांनी अचानक तिथे प्रवेश केला. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना तुम्ही तुमच्या घरात लपण्यास जागा दिली आहे असा आरोप पोलिसांनी केला. तुम्ही घरात जाऊन बघू शकता, मी कोणालाही लपण्यासाठी आश्रय दिलेला नाही असेही आपण त्यांना सांगितल्याचे कमलाबाईंनी म्हटले आहे. मात्र पोलिसांनी काहीही ऐकून न घेता मला आणि माझ्या पतीला मारहाण करायला सुरूवात केली, तसेच आम्हाला त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली.

आमच्यासह आमच्या नातवांनाही पोलिसांनी काहीही कारण नसताना मारहाण केली. तसेच आमच्या कुटुंबातल्या सात सदस्यांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी न्याय मागण्यासाठी मी आणि माझा मुलगा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भेटायला गेलो. मात्र तिथे आमची अडवणूक करण्यात आली असाही आरोप कमलाबाईंनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू असे आश्वासन पोलीस अधीक्षक अरविंद सक्सेना यांनी दिले आहे. मात्र कमलाबाईंना हात फ्रॅक्चर होईपर्यंत का मारण्यात आले? वृद्ध असूनही पोलिसांनी मुजोरी आणि दादागिरी का केली? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.